माझे बाबा!

31515CB8-FFA1-4D76-9AEE-35BDA444F043

खूप दिवसांनी लिहण्याचा योग्य आला. Father’s Day च्या निमित्ताने मी माझ्या बाबांसाठी आणि बाबांबद्दल लिहलेला छोटासा लेख.-

हानपणी  लाड पुरवणारे  आणि  लेक लग्न करताना, आईपेक्षा जास्त गहिवरणारे “माझे बाबा”. मला वाटतं, मात्रृत्व आणि आईच्या प्रेमापुढे ग्लॅमर न मिळालेलं नातं म्हणजे वडिलांचं आपल्या मुलांशी असलेलं नातं. मी कितीही आईवेडी असले तरीही माझ्या वडिलांशी माझं असलेलं नातं जास्त युनिक आहे.

लहानपणी बाबा संध्याकाळी घरी आल्यानंतर, “बाबा, माझ्यासाठी खाऊ आणला का?” असं मी विचारायचे. तिथपासून ते आता त्यांनी कधी पाकिटात पैसे घालून दिले तर, “अहो राहू देत. मी कमावते आता. तुमचे पैसे तुमच्या म्हातारपणासाठी ठेवा. मला फक्त आशीर्वाद द्या.” असं म्हणण्यापर्यंतचा तीस-बत्तीस वर्षांचा हा नात्याचा  प्रवास.

माझे माझ्या बाबांबरोबर कधी वाद झाले नाहीत असं नाही, पण त्या वादांपलीकडे आपल्या मुलांची मतं  समजून  घेण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. आमच्यात जनरेशन गॅप खूप असली तरीही ती मिटवण्याचा आणि काळानुसार स्वतःच्या तत्वांना आणि विचारांना मुरड घालण्याचा, काळानुसार ते बदलण्याचा मोठेपणा, ही माझ्या बाबांची खासियत.

कोणालाच आपल्या आयुष्यात स्ट्रगल चुकलेला नाही. आम्हालाही नाही. आत्ता दिसणारी आर्थिक परिस्थिती आम्ही सर्वांनीच खूप कष्ट करून कमावलीये. आणि यात माझा कायम आदर्श आहेत माझे बाबा. कुठल्याही आर्थिक संकटाने, मग ते कितीही मोठे असो, खचून न जात त्यावर मात करण्यासाठीच बळ आमच्या पंखात वडिलांनी लहानपणापासूनच दिलं. आणि म्हणूनच आज कमावलेल्या पैशांची किंमत आहे.

प्रत्येक मोठा निर्णय घेताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचं मत विचारात घेणारे “माझे बाबा”. अवाजवी हट्ट नाही, पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व लाड करणारे माझे बाबा. माझा हात धरून पहिल्यांदा मला शूटिंग च्या सेट वर घेऊन जाणारे आणि B. A  Economics  केल्यावर बँकेची परीक्षा दे म्हणून आग्रह धरणारे. आणि तरीही मी चित्रपट क्षेत्राची निवड केल्यावर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे बाबा. खरंतर खूप कमी व्यक्त होणारे, पण आईच्या तक्रारी घेऊन जेव्हा ते माझ्याकडे येतात, तेव्हा मला पालकाच्या भूमिकेत बघणारे. विश्वास, जबाबदारी आणि प्रेम या तीनही भावनांशी ओळख करून देणारे आणि त्यांना कायम घट्ट धरून ठेवणारे माझे बाबा.

“वायफळ खर्च करू नका.” हे बहुदा त्यांच्या आयुष्यच ब्रीदवाक्य आहे. आज मुलींकडे गाडी आहे, “बाबा, आपण गाडीने पुण्याला जाऊ.” असं म्हटलं तर, “छे, कशाला! पेट्रोल आणि टोल च्या पैशात माझ्या रेल्वे ने दोन पुणे ट्रिप होतील.” असा हिशोब ते वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षीही मांडतात. ‘चांगले, नवीन कपडे विकत घेणे’ आणि ‘महागड्या हॉटेल मध्ये जेवायला जाणे’ हे माझ्या बाबांचे “जानी  दुश्मन” आहेत. ‘कपडे फाटेपर्यंत वापरायचे.’ आणि फाटले तरच नवीन घ्यायचे हा  त्यांचा फंडा. माझ्या बाबांच्या कपाटात १९४२ (जेव्हा त्यांचा जन्म झाला) तेव्हाचेही कपडे असतील बहुदा. न फाटलेले. आणि हॉटेलचं म्हणाल तर, दादरच्या ‘सुजाता ‘ हॉटेल वर त्यांचं विशेष प्रेम . इतकं की वर्षानुवर्षे म्हणजे ते हॉटेल सुरु झालं तेव्हापासून ते आजपर्यंत माझे बाबा “सुजाता” मधेच जेवायला जातात. व्हेज  कोल्हापुरी , नावरतन कुर्मा, बटर रोटी  हेचं  खातात. इतका साधा माणूस.

माझ्या बाबांच्या डोळ्यात जादू आहे. त्यांच्या डोळ्यात खूप प्रेम आणि विश्वास आहे. मला आठवतंय, ‘ककस्पर्ष’ चित्रपट पाहून ते जरी निःशब्ध  झाले असले तरी त्यांचे डोळे खूप काही बोलत होते. माझ्या लग्नाच्या दिवशी आई-बाबांचं घर सोडताना जेव्हा माझे डोळे भरून आले तेव्हा, “आपल्या मर्जीने तू निर्णय घेतला आहेस. तुझ्या आनंदासाठी. तेव्हा रडून घरातून जाऊ नकोस.” असं सांगणाऱ्या माझ्या बाबांनी त्या दिवशी मला मारलेली मिठी मी कधीच विसरणार नाही.

72676C95-CB3C-4A97-859B-A63057A7C54D

आपल्याला दुसरी मुलगी झाली आणि ती कोणाला अप्रिय होऊ नये म्हणून माझ्या बाबांनी माझं नाव “प्रिया” ठेवलं. जेव्हा ते डोळे भरून बघतात आणि “शाब्बास!” असं म्हणतात, त्यापेक्षा मोठी दुसरी कुठलीही शाबासकी नाही. करियर मधले चढ़-उतार समजून घ्यायला जसा उमेश आहे तसंच , “बाबा माझं हे काम होईल ना हो?” असा पहिला फोन मी आजही बाबांना करते. त्यांनी दिलेला आधार आणि दाखवलेला विश्वास कुठल्याही गोष्टीला समोर जाण्यासाठी दहा हत्तीचं बळ देतो. बाबा, श्वेता आणि मी, आम्ही दोघीही कायम तुमची मान अभिमानाने उंच व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत आणि कायम असू.

मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं. कारण, I am proud to be ‘Sharad Bapat’s daughter. बाबा, तुम्ही मला “प्रिया” म्हटलत आणि “प्रिया शरद बापट” ही ओळख दिलीत जी मी आयुष्यभर जपेन.

– प्रिया शरद बापट.

प्रवास माणूसपणाचा!

4B3024E2-8580-47BA-AD26-94650D12ACCC

एक वर्ष पूर्वी मी माझी पहिली सोलो ट्रिप केली, खूप अनुभव घेतले, त्यानंतर प्रवास करतच राहिले. कधी एकटी, कधी मित्रांबरोबर , कधी उमेश बरोबर. पण प्रवास थांबला नाही. आणि अर्थातच तो चालूच राहणार.
२०१७ माझ्यासाठी खूप प्रवासाचं आणि खूप कामाचं वर्ष होत. खूप नवी माणसं भेटली, नव्या ओळखी झाल्या. काही नवी नाती निर्माण झाली. तर काही नात्यांचे बंध थोडे मोकळे झाले. आज खूप दिवसांनी, लिखाणातून मन मोकळा करायला बसल्ये, कदाचित थोडी भावुक होईन कि काय अशी भीती वाटते, पण काय हरकत आहे?? तोही माझाच एक भाग आहे मग लपवू कशाला आणि काय ?? सगळ्यात मोठी गोष्ट या वर्षी शिकले ती हीच. आपण माणूस म्हणून नक्की कसे आहोत? हे सांगणं खरंच अवघड आहे. कारण दर नव्या अनुभवांनंतर आपण बदलत जातो, समृद्ध होतो. आज विचार केला तर ५ वर्षांपूर्वीची मी आणि आत्ताची मी यात मलाच खूप फरक जाणवतो. गुंतणं , हा माझा स्वभावविशेष. मग ते कामात असो, माणसांत असो, मैत्रीत असो, नात्यात असो. ज्याला आपल म्हटलं ते फक्त निभवायचा नाही तर त्यात जीव ओतायचा हे माझा कधी ठरलं माहित नाही, पण त्यामुळेच मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीशी खूप जास्त प्रामाणिक राहू शकते. पण आपण असे आहोत म्हणून जगानेही तसेच असावे, हा माझा आग्रह माझ्याच खूप वेळा अंगाशी आला. आताशा मी तो सोडलंय म्हणा. तर, आपण माणूस म्हणून नक्की कसे आहोत, हे आपल्याला सुद्धा अनुभवागणिक उलगडत जात . नव्याने समोर आलेल्या गोष्टींना आपण कसे सामोरे जातो, त्या कशा निभावतो यातून.

मला कधीच वाटलं नव्हत मी सोशल मीडिया वर कोणाला follow करेन , त्या माणसाला त्याच्या शहरात जाऊन भेटेन आणि तो माझा मित्र होईल. माझ्या हिमाचल ट्रिप चा Inspiration अभिनव चांडेल. एक ट्रॅव्हलर, फोटोग्राफर , आणि लेखक. अभिनव च्या “नूर’ च्या गोष्टी खूप आत, खोल स्पर्शून जायच्या. त्याचं प्रत्येक लिखाण मी माझ्या त्या त्या वेळेच्या मानसिक अवस्थेशी जुळवून वाचायचे. आणि त्या ओळी जणू काही माझ्याच मनातलं त्याने उतरवल्या सारख्या खऱ्या वाटायच्या. प्रवासाने माझी अनोळखी लोकांबरोबर मैत्री करण्याची भीती घालवली. खरंतर कधी कधी वाटत, अनोळखी लोकांशी बोलणंच जास्त बर , कुठलेही पूर्वग्रह नाहीत, कुठलेही पाश नाहीत. सगळं कस नवं कोर करकरीत . आणि ती मैत्री सुद्धा प्रवासा पुरतीच, मग पुन्हा आपण आपल्या घरी, ते त्यांच्या घरी. “गुंतणं” नकोच. एकदा गुंतल कि मग तुमच्या अपेक्षा वाढायला लागतात.

“आम्ही दोघी” चित्रपटाच्या निमित्ताने गौरी देशपांडेच्या “सावी” शी ओळख झाली, खूप स्पष्ट काहीशी तुसडी पण तरीही हवीहवीशी. तिच्या काही काही विचारांनी माझ्या मनावर गारुड घातलं. मला स्वतःत डोकावून विचार करायला लावलं. खरंच आयुष्यात आपण कुठलीच गोष्ट निरपेक्ष भावनेनं करत नाही. अगदी आई होणं सुद्धा , आपण आपल्याला मूल हवं म्हणून आई होतो. एखाद्याशी मैत्री होते ते देखील, आपल्याला त्यातून आनंद मिळतो म्हणून. यात वाईट काहीच नाही. पण मुळात माणूस म्हणून हे मान्य करण महत्वाचं आहे.. मग काहीतरी अपेक्षा ठेवून जोडलेल्या नात्यांकडून अपेक्षा न करणं कसं शक्य आहे? हां , पण त्याचा त्रास न होऊ देणं हे आपल्याच हातात आहे. सावी म्हणते,”आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला स्वतंत्र द्यावं. अगदि आपल्यावर प्रेम न करण्याचं सुद्धा ” केवढा मोठा विचार!! आचरणात आणणं जरा अवघडच. पण मनाला पटत मात्र. आपलं आयुष्य हे लोकल ट्रेन सारखं आहे, त्यात आपल्या शेजारी बसलेल्या प्रवाशाशी मैत्री होते, गप्पा होतात, तो प्रवासी त्याचं स्टेशन आलं कि उतरून जातो. तो गेला म्हणून दुःख करण्या पेक्षा नवीन प्रवाशाची वाट पाहण जास्त आनंददायी आहे. कधी कधी वाटतं गुंतण्याच्या माझ्या स्वभावाने मी सावी मधेही इतकी गुंतले, कि माझ्यापासून तिला वेगळं करणं खूप कठीण झालं.

प्रवास हा काही फक्त नव्या जागा पाहण्याचा नाही, तर प्रवास आपल्या माणूसपणाचा देखील असतो. एका विचारातून, दुसऱ्या विचारांना आपलं म्हणण्याचा, आयुष्यातील रिकाम्या जागा भरण्याचा , आणि जाऊ इच्छिणार्यांना  आनंदाने निरोप देण्याचा, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीला आपलं म्हणण्याचा, त्यातून स्वतःला नव्याने शोधण्याचा , रडू आल तर रडण्याचा, मोकळं वाटलं तर मनसोक्त हसण्याचा. स्वतःवर प्रेम करण्याचा , दुसऱ्यांना समजून घेण्याचा. नवी नाती जोडण्याचा, आणि पुन्हा एकदा गुंतण्याचा. प्रवास माणूसपण टिकावण्याचा.

– प्रिया 😊

 

 

त्या संध्याकाळी!

 

IMG_9042

त्या संध्याकाळी!

मी उभी होते,
जोराचं वार सुटलं होत, मिटल्या डोळ्यांनी जागेचा थांग लागत नव्हता,
मी डोळे उघडले.
समोर पसरला होता अथांग समुद्र.
काळ , निळा , हिरव्या रंगाचा.
वर संधीप्रकाशात चमकणार आकाश,
वाळूत रुतत जाणारी माझी पावलं ,
आणि त्यांना स्पर्शून जाणारा पाण्याचा गारवा .

मी ओढली जात होते, त्या लाटांच्या दिशेने.
तरीही पाय वाळूत घट्ट रुतून होते,
जितकं मन लाटेकडे धाव घेत होत,
पाय तितकेच खोल खोल जात होते,
वाहणारा वारा कानात काहीतरी सांगू पाहत होता,
पण मनात उसळणाऱ्या लाटांच्या आवाजात काहीच ऐकू येत नव्हतं.

हळू हळू आकाशाचे रंग बदलले ,
गुलाबी. निळं. काळं.
सूर्याची जागा चंद्राने घेतली,
आणि चांदण्याही खुद्कन हसू लागल्या ,
मी मात्र तशीच होते.
मन धाव घेतच होत,
आणि पाय अजूनही रूततच होते.
तिथेच थांबले. तशीच. स्तब्ध.
आज रात्रीचा हा काळोख सरून,
उद्याच्या सूर्याची वाट पाहत.

😌

गर्दी

गर्दी, मनातली आणि जनातली…


माझं लहानपण दादरला गेलं असल्यामुळे नेहमीच्या आयुष्याचा भाग वाटणारी आणि कधीच परकी न वाटणारी गोष्ट म्हणजे ‘गर्दी.’ माझा जन्म शिवाजी पार्कचा आणि मी राहायचे दादर स्टेशनपासून चालत दोन मिनिटं अंतरावर. गर्दी हा दादरचा अविभाज्य भाग आहे. ज्या दिवशी रस्त्याला गर्दी नसते त्या दिवशी नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार किंवा सोमवार असणार. या सोमवारचं लहानपणी विशेष कौतुक वाटायचं. मंगळवार ते रविवार गजबजलेला रस्ता अचानक सुना सुना वाटे, काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटे.

माझ्या दादरच्या घरातल्या बाल्कनीतून तासन्तास ही गर्दी पाहत असे. त्यात वेळ कसा जायचा ते कळायचंच नाही. मोठी होत गेले तसं निरीक्षण वाढलं. आता मी या गर्दीत गोष्ट शोधू लागले. गाडीला टेकून उभ्या असणाºया नवीनच प्रेमात पडलेल्या कॉलेजच्या जोडप्याचा संवाद, प्रेम, भांडण असो की उनाड मुलांचा कंपू, बासरीवाल्यापासून ते अगदी एकमेकांना साथ देणारे आजी-आजोबा, मुलाला ओढत शाळेत नेणारी आई, अगदी नवरा-बायकोचं भांडणसुद्धा. कधी कधी हे सगळं इतक्या मोठ्या आवाजात चालू असे की त्यांचे संवाद मला बाल्कनीत तिसºया मजल्यावरही स्पष्ट ऐकू येत. तर कधी कधी त्यांच्या हावभावावरून अंदाज बांधायचे. एकदा एक आजोबा नुसतेच अनेक तास रस्त्याच्या कोपºयात बसून होते. मी दिवसभर त्यांना पाहत होते. काय चाललं असेल त्यांच्या मनात? घरचा पत्ता विसरले असतील? घरच्यांनी टाकलं असेल? की वेडे असतील? त्यांच्या मनात नक्की काय असेल याचा अंदाज शेवटपर्यंत आला नाही. संध्याकाळी पोलीस घेऊन गेले. ते त्यांच्या घरी अथवा वेड्यांच्या दवाखान्यात गेले असावेत.

या गर्दीतल्या लोकांच्या मनात चाललेल्या गोष्टीचा मी अंदाज बांधायचे. मोठी झाल्यावर मीही या गर्दीचा भाग कधी झाले कळलंच नाही. आता मात्र त्यांच्याबरोबर चालताना त्यांना अधिक जवळून अनुभवत होते. गर्दीला एक स्वत:चं अस्तित्व असतं हे जाणवलं. तिच्यातही गरीब-श्रीमंत असा भेदभाव आहेच. गर्दीच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो तो गर्दीचा वास. रस्त्यावरच्या गर्दीचा वास वेगळा. मंडईवरच्या गर्दीचा वास वेगळा, ट्रेनच्या गर्दीचा वास वेगळा. एसी मेट्रोमधला गर्दीचा वास वेगळा. गर्दी तीच. वेगवेगळ्या स्तरांतली, विविध स्वभावांची, विविध वृत्तींची, विविध आर्थिक परिस्थितीची; या प्रत्येक गर्दीचा एक स्वभाव असतो. मूडही असतो. याच गर्दीत माणसं एकमेकांना धक्केही देतात; पण वेळ आलीच सांभाळूनही घेतात. याच गर्दीत खिसेकापू पैसे कमवतात आणि याच गर्दीतील लोक प्रसंगी पैशाचा विचार न करता मदतीला धावून येतात. बसायला जागा मिळाली नाही की ट्रेनमध्ये रागाने चरफडतात, पण त्याच गर्दीत एकमुखाने भजनही गातात. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वेळा शारीरिक त्रासही सहन करावा लागतो, पण मन एकटं असताना हीच गर्दी आपलीशी वाटते.

गर्दी ही फक्त माणसांची नसते हे थोडं अजून मोठं झाल्यावर कळलं. घरात एकटं बसूनही गर्दीचा अनुभव येतोच हल्ली. पण ही गर्दी विचारांची असते. चांगल्या, वाईट, आनंदी, दु:खी, चूक, बरोबर अशा सगळ्या विचारांची डोक्यात झालेली गर्दी. या गर्दीला वास नाही पण स्वभाव आहे. ऑफिस, कॉलेज, शाळांमध्ये असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्याची जिद्द, धडपड, रोज भेटणारी नवी माणसं, निर्माण होणारी नवी नाती, नात्यांना मिळणारी नवी ओळख आणि त्यातून वाढत जाणारा गुंता, आपणच वाढवून ठेवलेल्या गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी स्वत:ची चाललेली ओढाताण. प्रश्नं वाढतच जातात पण उत्तरं त्याच वेगाने मिळत नाहीत. रस्त्यावरच्या गर्दीला सोमवारी तरी सुट्टी मिळायची. पण डोक्यातल्या गर्दीला सोमवारही नाही.

माझ्या प्रवासामध्ये मी एकटी असले तरी विचार कायमच सोबतीला असतात. सतत विचारांच्या आणि भावभावनांच्या गराड्यात असतो. या गर्दीबद्दल एकदा विचार करत बसले होते. मनातली ही गर्दी जास्त सोपी की रस्त्यावरील माणसांची गर्दी सोपी? विचार करताना एक लक्षात आलं की आपण बाहेरून जे पाहतो ते नेहमीच सोपं वाटतं आणि आपण ज्याचा भाग असतो ते नेहमीच क्लिष्ट वाटतं. माणसांच्या गर्दीत अडकलेलो असताना त्यातून कधी एकदा बाहेर पडतोय, असं वाटतं. पण हीच माणसांची गर्दी बाल्कनीतून पाहताना फारच गमतीशीर वाटते. मनात चाललेल्या विचारांच्या आणि भावनेच्या गर्दीने मनाची घालमेल होते, उत्तर शोधण्यासाठीची धडपड सुरू होते. पण दुसºयाच्या मनात चाललेल्या गोष्टींचं नुसतं निरीक्षण करत बसायला आपण खूप उत्सुक असतो. आपण एवढा कसला विचार करतो? का करतो? मनुष्याचा स्वभावधर्म म्हणायचा की ओढवून घेतलेल्या सवयी आणि तणाव? चिमणीची पिल्लं काही दिवसांत स्वतंत्र होऊन उडून जातात. प्राण्यांची पिल्लंदेखील काही दिवसांतच स्वत: शिकार करतात. माणसाचं मात्र तसं नसतं. नवं जन्माला आलेलं बाळ स्वत:च्या पायावर उभं राहायलाच किमान वर्ष-दीड वर्ष घेतं. आपली मुलं कितीही मोठी झाली तरीही माणसांची एकमेकांमधली भावनिक गुंतवणूक त्यांना कधीच पूर्ण स्वतंत्र होऊ देत नाही. मग तयार होते भावनांची गर्दी. दुसºयाच्या, स्वत:च्या आनंदाची, यशाची, कुरघोडीची, स्पर्धेची, समृद्धीची, काळजीची आणि अपेक्षांची मनात आणि डोक्यात भरलेली गर्दी. सोमवार, रविवार कधीच सुट्टी न घेणारी.

मध्यंतरी एक पुस्तक वाचताना या सर्व विचारांवर उत्तर मिळालं आणि वाटलं असं जगता आणि असं वागता आलं तर सगळं जग सुखी होईल. ‘नदी ही एकाच वेळी सर्वत्र असते. तिच्या मुखाशी, तिच्या मूळ उगम स्रोताशी, धबधब्याशी, तिच्या पात्राशी आणि समुद्राला मिळते तिथेही. ती एकाच वेळी सगळीकडे असते. पण आपण जिथे तिला पाहतो, त्या वेळी फक्त तिथेच तिला अनुभवू शकतो. त्या क्षणी तिचे त्या क्षणाचे अस्तित्व सोडून ना आपण तिचे मूळ स्रोत पाहू शकतो, ना जिथे ती समुद्रास मिळते ते पाहू शकतो’, याचा अर्थ असा की, माणसानेही भविष्य आणि भूतकाळात न अडकता वर्तमानातल्या प्रत्येक क्षणाची पूर्ण अनुभूती घेतली पाहिजे. नदीसारखं त्या क्षणी तिथे जगता आलं पाहिजे. जर भूतकाळाचा किंवा भविष्याचा त्रास, काळजी नसेल तर डोक्यातल्या गर्दीला रोजच सोमवारची सुट्टी मिळेल, नाही का?

—————— (समाप्त)————————

Tomorrow

IMG_0978

What if there is no tomorrow?
I want to hold your hand and sit by the sea side till the night dies,
I won’t be scared of the darkness of the night.
I want to be in your arms and share the stories looking at the stars.
I want to look deep into your eyes, and get lost,where no one can find us.
I want to kiss your forehead and your cheeks and love you with all my heart.
So, Let’s close our eyes, let’s love, let’s laugh and follow our dreams.
And love, if tomorrow comes, let’s do it all over again.

Your’s

-Priya

पोंडीचेरी

IMG_9016पोंडीचेरीत स्वत:ला शोधताना…

‘आम्ही ट्रॅव्हलकर’ हा ट्रॅव्हल शो करताना फिरण्याची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी माणसं भेटली, त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि मुंबई, महाराष्ट्र, खरं तर दादर सोडून कितीतरी वेगळं जग अस्तित्वात आहे याची जाणीव झाली. या ट्रॅव्हल शो दरम्यान लेखिका म्हणून ओळख झाली आणि नंतर मैत्री झाली ती, आदिती मोघेशी. साधारण फॅब इंडिया, आजीचा बटवा, हिप्पी लोक या सर्वाचं एकत्रित संयोजन म्हणजे आदिती. मूळची वसईची, राहते मुंबईत पण पक्की पुणेरी वाटेल अशी. आदितीचा उल्लेख केला, कारण ती आहे फिरण्यासाठी, प्रवास करण्यासाठी मला प्रोत्साहन देणारी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती. आमच्या ट्रॅव्हल शो दरम्यान तिच्या सोलो ट्रिपच्या गोष्टी ऐकल्या आणि वाटलं यार! किती भारी आहे ना हे! म्हणजे, मी कायमच स्वत:त रमले, एकटी पुस्तकं, कॉफी एन्जॉय करते, पण ते माझ्या शहरात, माझ्या घराजवळ. आपलं घर सोडून, दुसऱ्या राज्यात, नवी भाषा, कदाचित येणारी – कदाचित न येणारी. अशा ठिकाणी प्रवास करणं किती कमाल असेल. पण फक्त विचारच. नियोजन करायला कधी धजावले नाही. ‘वजनदार’ चित्रपटाच्या जाहिरातीच्या निमित्ताने कल्याणीशी मैत्री झाली. मॅकलॉइड गंज, धरमशाला, इकडचे तिचे प्रवासाचे किस्से ऐकले आणि माझ्यातला प्रवासी होण्याचा किडा पुन्हा वळवळला. पण या वेळी मात्र हा विचार पूर्णत्वाला नेण्याचं मी ठरवलं. खूप चर्चा, खूप अभ्यास करून शेवटी माझी पहिली ‘सोलो ट्रिप’ मी पाँडेचरीला करायचं ठरवलं.

५ डिसेंबर २०१६ ही तारीख ठरली. विमानाचं आणि हॉटेलचं बुकिंग झालं. खूप साऱ्या उत्साहाने, खूप साऱ्या नोट्स काढून, तयारी करून ४ डिसेंबरला रात्री बॅग भरली. माझं आय पॅड, ब्ल्यूटूथ स्पीकर, हेडफोन्स, पुस्तकं अािण कपडे. उद्या जाण्याच्या आनंदाने रात्री झोप लागत नव्हती. कधी झोपले कळलंच नाही. पण उठले ते एका एसएमएसने. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती गंभीर होती आणि त्यामुळे त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यांनी रस्त्यावर येण्यास सुरुवात केली होती. संपूर्ण तामिळनाडू राज्य त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत होतं. तिकडची परिस्थिती आणि लोकांची मानसिकता लक्षात घेता, काही तरी होईल, चेन्नई बंद पडेल, दगडफेक होईल, या सगळ्या विचारांनी, भीतीने, काळजीने घेरलं. आणि मी विमानतळावर गेलेच नाही. भरलेली बॅग उपसून सगळं सामान परत कपाटात ठेवलं. मध्ये दोन आठवडे खूप उलथापालथ झाल्यावर मी पुन्हा एकदा ट्रिप ठरवण्याच्या मूडमध्ये आले. सगळे तेव्हाच म्हणत होते, एवढं ठरवलं आहेस तर जागा बदल आणि जा.. पण माझी पहिली सोलो ट्रिप पाँडिचेरीलाच करायची हे माझं ठरलं होतं.
थोडं संशोधन करताना काही तरी वेगळा आपलेपणा वाटत होता या जागेबद्दल. आणि प्रवासात मला सगळ्यात जास्त मोहीत करणारी गोष्ट म्हणजे कॅफे. ते तर जवळपास पाँडिचेरीच्या संस्कृतीचा एक भागच होते. पुन्हा एकदा तिकिटं बुक केली आणि २५ डिसेंबरला पाँडिचेरीला रवाना झाले. चेन्नई विमानतळावर पोहोचले. हॉटेलशी आधीच बोलणं झालेलं असल्याने ड्रायव्हर मला नेण्यासाठी आला. प्रवास करताना मला जाणवलेली गोष्ट म्हणजे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रवास हा लवकर आणि सुखकर असावा (त्यात वेळ घालवू नये.). आणि तसा तो सुखकर झालासुद्धा. विजय नावाचा माझा ड्रायव्हर होता. प्रवासाने आणि पहाटेचं विमान असल्याने मी गाडीत जरा झोपले किंवा शांत बसले तर तो खट्ट व्हायचा. माझ्या बडबडीला जोरदार स्पर्धा देणारा विजय! आमच्या गप्पांमधून त्याला जेव्हा कळलं की मी अभिनेत्री आहे, तेव्हा तो गाडीत उडय़ा मारायचा बाकी राहिला होता. ‘वॉव.. सेलेब्रिटी इन माय कार.. आय अ‍ॅम व्हेरी हॅपी.’ त्याला जमेल तशा इंग्लिशमध्ये त्याने त्याला झालेला आनंद व्यक्त केला. आणि मग मुद्दाम मला रस्त्यात दिसणारे दक्षिणेच्या सुपरस्टारचे बंगले दाखवू लागला. इतकंच नाही तर मी बुचडा करून वर बांधलेले केस मोकळे सोडल्यावर खूप खूश झाला. माझ्या मनात मात्र शंभर विचार आले. असा काय हा? मी उगाच जास्त गप्पा मारतेय का? पासून ते सगळेच लोक वाईट नसतात, कोणालाही असं जज करण्यापूर्वी जरा वेळ जाऊ द्यावा इथपर्यंत. पण खरं सांगू? त्याचा हाच साधेपणा मला भावला होता.
दोन-अडीच तासांच्या छान संगीतमय प्रवासानंतर मी हॉटेलमध्ये पोहोचले. वाटेत खूप सारी तमिळ गाणी ऐकली. आपण ज्या राज्यात आहोत त्याच भाषेतील संगीत ऐकण्याचा माझा उगाच एक हट्ट. हॉटेलमध्ये चेक इन केलं, थोडा आराम केला आणि माझ्या ऑरोवीलच्या प्रवासासाठी एक रिक्षा बोलावली. आजपासून हीच माझी सफारी. पिक अप आणि ड्रॉप सेवा. इश्वरम असं माझ्या रिक्षावाल्याचं नाव होतं आणि खरं तर ईश्वरम माझा पाँडिचेरीमधला पहिला मित्र. तो मला ‘मा’ किंवा ‘अम्मा’ म्हणायचा. आणि जणू काही मी त्याची जबाबदारी आहे अशी काळजी करायचा. इश्वरमने मला ऑरोवीलच्या व्हिजिटिंग सेंटरला सोडले. तिथे जाऊन थोडी चौकशी करून माझ्या ट्रिपची सुरुवात झाली.

खरं सांगू? पहिल्या दिवशी मी ऑरोवीलचा परिसर पाहिला, मातृमंदिर बाहेरून पाहिलं पण माझं संपूर्ण लक्ष स्वत:ला सांभाळण्यात, आपल्याकडे कोणी पहात नाही ना याचा विचार करण्यात गेलं. मी जे समोर बघत होते ते मी पूर्ण लक्ष देऊन एन्जॉयच करत नव्हते. एखाद्या ठिकाणी आपण नवीन आहोत, आपल्याला इथली माहिती नाही, आणि ती करून घेण्यासाठी आपण एकटेच आहोत, ही जाणीव सतत माझ्याबरोबर होती. मला एकटीने प्रवास करायची भीती वाटायची, कारण एकच विचार मला त्रास द्यायचा. कोणी मला पळवून नेलं आणि काही केलं तर? याचमुळे कदाचित पहिला दिवस माझा स्वत:ला सावरण्यात आणि माझी सुरक्षितता पाहण्यात गेला.

दुसऱ्या दिवशी मात्र मी या शहरात एकदम सेट झाले. सकाळी लवकर उठून ऑरोवीलला गेले. त्या दिवशी माझी ऑरोवीलशी खरी ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही. श्री अरबिंदो यांचं तत्त्वज्ञान मानणारं आणि त्यांच्या विचारांवर आधारित एक युनिव्हर्सल टाऊनशिप म्हणजे ऑरोवील. तमिळ, संस्कृत, फ्रेंच, इंग्लिश या चार भाषांमध्ये इथे संवाद साधला जातो. शांतता आणि सुसंवाद साधण्यासाठी जगभरातून लोक इथे येऊन स्थायिक होतात. उपजीविकेसाठी ऑरोवीलमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. कागद बनविणे, जंगलसंवर्धन, मडकी किंवा मातीच्या वस्तू बनवणे आणि इतरही अनेक.

आजचा संपूर्ण दिवस हा परिसर अनुभवायचा असं ठरवलं. व्हिजिटिंग सेंटरजवळ एका कॅफे शेजारी सायकल भाडय़ाने मिळत होती. मी त्यांच्याकडे गेले, पैसे दिले, पण मला हवी तशी, माझ्या मापाची सायकल नव्हती म्हणून थांबले. उगाच इकडेतिकडे भटकले, आणि अध्र्या तासाने पुन्हा चौकशी केली. अरे! मी दिवसभर त्या सायकलवर भटकणार तर ती सायकल धष्टपुष्ट नको का? गंजलेली, आजारी दिसणारी सायकल नकोच होती मला. आणि माझी थांबायची तयारीसुद्धा होती. माझं तिथलं घुटमळणं पाहून तिकडच्या अम्मापर्यंत माझी ओढ पोहोचली बहुतेक. तिने प्रयत्नपूर्वक माझ्यासाठी एक चांगली सायकल राखून ठेवली. मी फारच खूश झाले. सायकल घेतली आणि निघाले. पण इतक्या सहजपणे एखाद्या गोष्टीचा आनंद घेता आला, तर त्याची किंमत कशी कळणार? मी बाहेर येतानाच त्या सायकलची चेन निघाली आणि चाकात अडकली. आता हे कुठे दुरुस्त करता येत होतं मला! मी कोणी मदत करू शकेल का ते शोधू लागले. व्हिजिटिंग सेंटरच्या पार्किंग एरियामध्ये जवळजवळ एक परदेशी माणूस दिसला. मी त्याला विनंती केली अणि एका क्षणाचाही विलंब न करता तो लगेच मदतीला तयार झाला. त्याने काय झालंय ते नीट बघितलं. सायकल वाकडी केली, आणि चेन सोडवली. पण सोडवली म्हणजे आता ती पूर्णच बाहेर आली! झाली का पंचाईत. आता याचं काय करायचं? तो म्हणाला हे नाही दुरुस्त होणारं. सायकल आत्ताच भाडय़ाने घेतली असेल तर परत करा. पण माझी आता ही सायकल परत करण्याची इच्छा नव्हती. मी त्याला विनंती केली, एक शेवटचा प्रयत्न करू, नाही झालं तर बघू. तोही बिचारा माझा केविलवाणा चेहरा बघून तयार झाला. त्याने चेन सोडवली आणि पुन्हा त्या आकडय़ांमध्ये गुंफू लागला. पाच मिनिटांच्या प्रयत्नानंतर अखेरीस ती चेन बसली. आणि सायकल पूर्ववत झाली. मी तिथेच एक छोटी चक्कर मारून बघितली आणि त्याला खूप खूप धन्यवाद म्हटलं. आणि ऐटीत पेडल मारून माझ्या प्रवासाला सुरुवात केली.

मातीचा रस्ता, दोन्ही बाजूला झाडं आणि सोबतीला माझ्यासारखे सायकलवर टांग मारून फिरायला निघालेले वेगवेगळ्या देशांतले, वेगवेगळी भाषा बोलणारे माझे प्रवासी मित्र. ऑरोवीलच्या रस्त्यावर सायकलने फिरण्याचा आनंद वेगळाच होता. फिरत फिरत, नवे रस्ते शोधत, नव्या गल्ल्या पहात मी एका चौकात येऊन थांबले. त्या चौकातील तीन रस्ते डांबरी होते आणि एकच समोर जाणारा रस्ता मातीचा होता. अर्थातच मी तोच रस्ता निवडण्याचं ठरवलं. एरवी चौकात माहितीचे बोर्ड होते पण या चौकात तसं काही दिसत नव्हतं. नजर जाईल तिथपर्यंत समोर मातीचा रस्ता दिसत होता. पेडल मारलं आणि त्या रस्त्याच्या दिशेने निघाले. सायकल चालवताना आमच्या फिटनेसच्या परुळेकर सरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवत राहिली. सायकलिस्टने नजर समोर पण कान मात्र पूर्ण उघडे ठेवावे लागतात. आपल्या मागून येणाऱ्या गाडय़ांचा आवाजानेच अंदाज घ्यावा लागतो. मनात इतर विचार न येऊ देता, पूर्ण शांततेने अािण एकाग्रतेने सायकलच्या तालाशी एकरूप होऊन जायचं. आता मी, माझे हृदयाचे ठोके अािण सायकलच्या चाकाचा लूप एका तालामध्ये होतो. त्या न संपणाऱ्या मातीच्या रस्त्यावर. जिथे बाजूला मोकळं माळरान आणि मध्येच फुलझाडं होती. थोडय़ा वेळाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं दिसू लागली. असं वाटलं, डोक्यावरचं ऊन जसं वाढलं तसं निसर्गाने आपोआप आपल्या सावलीची सोय केली. दोन मिनिटं तसंच पुढे चालल्यावर अचानक छान सुगंध आला आणि मी थांबले. मातीच्या रस्त्याबाजूला मोगरा आणि जाईची झाडं होती. डोक्यावर सूर्य तळपत असला तरी त्याची झळ पोहोचणार नाही याची काळजी झाडांनी घेतली, उकाडय़ाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या सावलीत, गारव्यात मला सामावून घेतलं. आणि माझा अनुभव अजून स्पेशल करण्यासाठी सर्वत्र माती आणि मोगऱ्याचा गंध पसरला होता. काही वेळ सायकल बाजूला लावून मी तिथेच थांबले. तो गंध श्वासात भरून घेतला. डोळे मिटले आणि आपोआप चेहऱ्यावर हसू आलं. मनातल्या मनात या खूप स्पेशल अनुभवाबद्दल धन्यवाद म्हटलं आणि निघाले.

ऑरोवीलचे रस्ते फिरून झाले, ऊन उतरू लागले. मी सायकल व्हिझिटिंग सेंटरला परत दिली आणि ईश्वरमला बोलावलं. तिथून निघाले आणि थेट सेरेनिटी बीचवर गेले. मला समुद्र कायमच खूप आकर्षित करतो. पाण्याशी, पावसाशी माझं वेगळं नातं आहे असं वाटतं. पाणी, त्याची स्थिरता, लाटांचा उथळपणा, किनाऱ्याकडे धावण्याची ओढ आणि परत मागे फिरण्याची घाई. समुद्र आपल्याला खूप काही शिकवतो असं मला वाटतं. मी बीचवर पोहोचले. तिथल्या खडकांवर जाऊन शांत बसले. सिनेमा आणि नाटकांचा आपल्यावर किती परिणाम झालाय हे तेव्हा कळलं. तिथे पोहोचल्यावर मला वाटलं, आता मी सिनेमातल्या पात्रांसारखी शांत उभी राहणार, आयुष्याचा विचार करणार, दु:ख समुद्रात फेकून देणार अािण नव्याने उभारी घेणार. बापरे! किती तो फिल्मीपणा. जितकी संहिता मी मनात लिहीत होते, त्यातलं खरं तर काहीच घडलं नाही. मी त्या दगडांवर शांत बसले फक्त. समुद्राचा आवाज ऐकत, दगडावर आदळणाऱ्या लाटा पाहात. आज तर मला तो निळा आहे की हिरवा हेसुद्धा नीट दिसत नव्हतं. मी फक्त त्याचं अस्तित्व आणि माझं तिथे असणं अनुभवत होते.

आपलं मनसुद्धा या लाटांसारखंच असतं. सतत कशाच्या तरी ओढीने धावणारं आणि हाती लागताच मागे फिरणारं. पाण्याची किंवा समुद्राची वेगवेगळी रूपं मला माझ्या स्वभावासारखी वाटतात. कधी शांत, कधी भयंकर खवळलेला, कधी स्वच्छ पारदर्शी तर कधी तळाचा थांगच न लागू देणारा. खूप वेळ शांतपणे फक्त समुद्राचा आवाज ऐकत बसून रहिले. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, जवळच्याच एका कॅफेमध्ये बसून सूर्यास्त अनुभवत कॉफी प्यायले. पॅनकेकवर मेपल सिरप घालून छान खाल्लं. स्वत:चे इतके लाड केल्याचं मलाच कौतुक वाटलं. ईश्वरमला बोलावून थेट हॉटेल गाठलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाँडिचेरी शहर बघायला बाहेर पडले. फ्रेंच कॉलनी असल्यामुळे इथल्या बिल्डिंग्स, ऑफिसर्सचे जुने बंगले, घरं या सगळ्यावर फ्रेंच वास्तुशास्त्रज्ञाचा प्रभाव दिसतो. तामिळनाडूमध्ये एक गोष्ट जाणवली. तुम्ही गरीब असा की श्रीमंत, घर छोटं असो की बंगला असो, प्रत्येक घराबाहेर रांगोळी असतेच. फ्रेंच कॉलनी, छोटे रस्ते, बैठी घरं आणि घराबाहेर रांगोळी हे वातावरण फारच प्रसन्न करणारं होतं.

ट्रॅव्हल कंपन्या जसं फिरवतात, तसं नुसतं यादीचा पाठपुरावा करण्यात मला अजिबात रस नव्हता. मी पाँडिचेरीत काय पाहिलं हे लोकांना सांगण्यापेक्षा, मी जे पाहतेय त्याचा पूर्ण अनुभव घेणं मला जास्त आवडतं. पॅरिसला जाऊन आयफेल टॉवर नाही पाहिला तरी काही हरकत नाही. मुळात आपण ज्या ठिकाणी जात आहोत, तिकडची फक्त लोकप्रिय पर्यटनस्थळे हा काही त्या जागेचा आत्मा नाही. फिरायचं असेल, तिथली संस्कृती समजून घ्यायची असेल आणि त्या जागेशी मैत्री करायची असेल. तर लोकप्रिय जागा सोडून थोडं आत डोकावून पाहायला लागतं. त्यामुळे पाँडिचेरीला येऊन गणेश मंदिर पाहिलं का? आश्रम पाहिला का? चर्च पाहिलं का? या पलीकडे जाऊन रस्त्यांवर चालत फिरणं, इकडच्या माणसांशी मैत्री करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, इकडचे कॅफे जे या संस्कृतीचा भाग आहेत त्याचा अनुभव घेणं मला जास्त आवडतं.

सकाळी अकरा साडेअकराची वेळ होती. फारसं ऊनही नव्हतं. त्या छोटय़ा गल्ल्यांमधून चालत फिरताना एक छान कॅफे दिसला. ‘आर्टिका कॅफे गॅलरी’. दोन्ही बाजूला केळीचे खांब उभारून मुख्य रस्त्यावरून १०-१२ पावलं आत जाण्याचा सुंदर पादचारी मार्ग तयार केला होता. कॅफे गॅलरी ही संकल्पना मी पहिल्यांदाच पाहात होते. त्या कॅफेच्या प्रत्येक भिंतीवर सुरेख पेंटिंग केली होती. टॉयलेटचा दरवाजासुद्धा रंगवला होता. पांढरा शुभ्र कॅफे, छोटी पांढरी टेबलं, खुच्र्या, एका बाजूला मोठय़ा ग्रुपसाठी बसायला लाकडी सोफा आणि त्याच्यामागे दोन खोल्या. एका खोलीत फॅमिली रुम आणि दुसऱ्या खोलीत कलादालन. तिथे वेगवेगळ्या वस्तू विकायला ठेवलेल्या. पोस्टकार्ड, चित्र, टी-शर्ट्स, पुस्तकं बरंच काही.

मी आत गेले. सगळीकडे नजर फिरवली आणि झाडाखालचं एक पांढरं टेबल हेरलं. ही आपली जागा, असं म्हणत बॅग ठेवली. एक कप कॉफी आणि क्रोईसंट ऑर्डर केलं. आणि सॅकमधून माझं पुस्तक बाहेर काढलं. माझ्यासारखंच हातात पुस्तक घेऊन दोन-तीन जणं तिथे बसली होती. काही मित्र-मैत्रिणींचे ग्रुप होते. काही जोडपी होती. पण तरीही सगळं शांत. त्या जागेची शांत आणि प्रसन्नता कोणीच भंग करत नव्हतं. प्रत्येक जण आपापला आनंद घेण्यात मग्न होते. मी पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. मुराकामी या जपानी लेखकाचं ‘काफ्का ऑन द शोर’ हे इंग्रजी अनुवादित पुस्तक मी वाचत होते. ते पुस्तकही मला अशा वळणावर नेत होतं जिथे हातातून ते खाली ठेवण्याचा मोह होत नव्हता. कॉफी झाली, क्रोईसंट आला. एकीकडे खात, दुसरीकडे डोकं पुस्तकात घालून मी किती तास तिथेच बसले याचा अंदाजच मला नव्हता. अचानक थोडय़ा वेळाने घडय़ाळ पाहिलं तर दुपारचे साडेतीन झाले होते.

एकाच जागी असं चार तास वाचत बसण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. ती जागा तशी होती की पुस्तक तसं होतं माहीत नाही. पण हे नव्याने तयार झालेलं जग सोडून दुसरीकडे जावंसंच वाटत नव्हतं. मी तिथेच बसले, जेवले. माझ्यासारखंच वाचत बसलेल्या एका कॅनेडिअन मुलाशी ओळख झाली. तो हिंदू धर्मावर पीएच.डी. करत होता. कॅनडा युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होता. त्याच्याशी गप्पा मारताना स्वत:ची थोडी लाज वाटली. माझ्या देशाबद्दल, माझ्या संस्कृतीबद्दल माझ्यापेक्षा खूप जास्त अभ्यास त्याचा होता. रामायण आणि महाभारताविषयी तो भरभरून बोलत होता. हिंदू संस्कृतीबद्दल त्याला एवढं आत्मीयतेने बोलताना पाहून मला खूप छान वाटलं. तिथेच स्कॉटलंडहून आलेलं एक जोडपं भेटलं. त्यांचा फोटो काढण्याच्या निमित्ताने बोलायला सुरुवात झाली आणि गप्पा रंगत गेल्या.

मेघालय आणि पाँडिचेरीच्या प्रवासामधला हा महत्त्वाचा फरक मला जाणवला. मेघालयात फार सुंदर निसर्ग अनुभवला. खूप वेगवेगळी रूपं पाहिली. आणि पाँडिचेरीमध्ये मी माणसं अनुभवली. खूप नवे मित्र जोडले. त्या त्या जागी आपल्याला भेटलेली माणसं, त्यांच्याशी झालेला संवाद, तुम्हाला माणूस म्हणून खूप शिकवून जातो. एरवी रस्त्यातून चालताना कोणाशी कशाला बोलायचं? ते काय म्हणतील? हा सगळा ‘मी’पणा इथे गळून पडला. मला बदलवणारी, शिकवणारी, मला पेचात पाडणारी आणि माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला पाँडिचेरीत भेटली. हा या ट्रिपने मला दिलेला अनमोल ठेवा.

त्यातला मौल्यवान ठेवा म्हणजे राजा. नावाप्रमाणेच मनाचा राजा. मुंबईतल्या माझ्या एका मित्राने मी पाँडिचेरीला जाणार म्हटल्यावर राजाचा नंबर मला आधीच दिला होता. राजा हा माझ्या मित्राचा मित्र. ऑरोवीलमध्येच जन्माला आलेला. दिसायला रांगडा पण मनाने हळवा. राजा खरंच फुल ऑफ लाइफ व्यक्तिमत्त्व आहे. ऑरोवीलमधल्या कॅफेत माझी राजाशी पहिली भेट झाली. भेटताच क्षणी त्याच्या उत्साह आणि प्रचंड एनर्जीने मी भारावून गेले. भेटल्या क्षणापासून त्याची गडबड सुरू झाली. आणि पहिल्याच भेटीत आम्ही दोस्त झालो. या भेटीत राजा बोलत होता आणि मी ऐकत होते. त्याला त्याच्या जन्माचं वर्षच माहीत नव्हतं. मी विचारलं कसं काय? तर म्हणाला ‘‘माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांची जन्मतारीख घराच्या भिंतीवर लिहून ठेवली होती. आम्ही समुद्राजवळ राहायचो. एक दिवस चक्रीवादळ आलं, त्यात घर वाहून गेलं. ती भिंतपण गेली. त्यामुळे जन्मतारखेचा पुरावा गेला.’’ हे सगळं सांगताना राजा हसत होता. आणि मी खोटं हसण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या आयुष्यातली एवढी मोठी घटना त्याने अशी पटकन सांगून टाकली. हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर जराही दु:ख नव्हतं. आपण जे गमावलंय त्यापेक्षा जे आहे त्यात तो खूप समाधानी होता.

राजाचं एक छोटंसं मातीचं घर आहे. त्याला त्याच्या घरामागच्या जागेत डान्स स्टुडिओ बांधायचाय. डान्स हा राजाचा जीव की प्राण. ऑरोवीलमध्ये तो सालसा शिकला आणि बंगलोरला कण्टेम्पररी डान्स. आता जबाबदाऱ्यांमुळे डान्स मागे पडण्याचं दु:खं त्याच्या चेहऱ्यावर जास्त दिसतं. दुपारी ऑरोवीलच्या सोलार किचनमध्ये मस्तपैकी जेवलो. आणि राजा मला तो मॅनेजर असलेलं गेस्ट हाऊस दाखवायला घेऊन गेला. तिथे गेल्या क्षणी पाच मिनिटांत माझी सगळ्यांशी मैत्री झाली. भारतीय, फ्रेंच, नेदरलॅण्ड अशा वेगवेगळ्या देशांतले, वेगवेगळ्या वयोगटांतले माझे नवे मित्र.

सगळ्यांनी आपापल्या बाइक काढल्या. मी राजाच्या बाइकवर बसले. आणि ते मला थेट घेऊन आले ऑरोविलच्या युनिटी पॅव्हेलियन हॉलमध्ये. इथे फाइव्ह ऱ्हिदम वेव्ह डान्स वर्कशॉपचा ओरिंटेशन दिवस होता. ओरिंटेशन म्हणजे पुढे आठ दिवसांच्या कार्यशाळेमध्ये नक्की काय होणार याची झलक. डान्स आणि राजा हे कॉम्बिनेशन माझ्याबरोबर होतं. राजाने मला विचारलं आणि काही तरी वेगळं पाहायला मिळेल म्हणून मीही होकार दिला.

आम्ही आत गेलो. आणि समोर जे पाहिलं ते बघून जागीच थांबले. फाइव्ह ऱ्हिदम वेव्ह म्हणजे नेमकं काय याचा अंदाज मी घेत होते. त्या हॉलमध्ये खूप जण होते, पण तरीही गर्दी नव्हती. तिथल इन्स्ट्रक्टर सांगतील तसं त्या संगीतावर लोक ताल धरत होते. मी थोडीशी बिचकत कोपऱ्यात उभी राहिले. पाहात होते. त्या हॉलमधली सर्व माणसं एक तर स्वत:त हरवलेली किंवा स्वत:ला शोधणारी. मी थोडी अवघडले. मी स्वत:ला असं झोकून दिलं, तर कशी दिसेन? लोक हसतील? अशा ‘मी’ पणाच्या विचारांनी मला अडवून ठेवलं होतं. माझ्या डोळ्यांसमोर ताल धरणाऱ्या माणसांना खरंच इतकं हलकं वाटलं होतं की सगळेच देखावा करत होते? काही कळत नव्हतं. राजा मात्र कधीच त्यातला एक भाग झाला होता. मी डोळे मिटले. विचार केला. कोणी हसलं तर काय होईल? काही नाही. कोणी वेडं म्हणालं तर काय होईल? काही नाही. पण जर मी गेलेच नाही, तर काही तरी अनुभवायचं राहून गेलं याची खंत मनात राहील. मी डोळे उघडले आणि शांतपणे जाऊन त्या गर्दीत उभी राहिले.

‘फाइव्ह ऱ्हिदम इज अ मूव्हमेंट मेडिटेशन प्रॅक्टिस. इट इज टू पुट अ बॉडी इन मोशन इन ऑर्डर टू स्टिल द माइण्ड’.
डोक्यापासून, पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाचं अस्तित्व जाणवून घ्यायचं. प्रत्येक अवयवाची मनाशी सांगड घालायची. मी डोळे मिटून घेतले आणि त्या संगीताच्या तालावर स्वत:ला मोकळं सोडलं. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग हा त्या संगीताला प्रतिसाद देत होता. थोडय़ाच वेळात माझं स्वत:वरचं लक्ष उडून गेलं आणि मीसुद्धा त्या गर्दीचा एक भाग झाले. अनेक वर्षांचं डोक्यावरचं कसलं तरी ओझं खाली गळून पडलं. शरीर हलकं झालं होतं, पण त्यातलं त्राण गेलं नव्हतं. माझं मन आणि शरीर एकमेकांपासून वेगळे झाले होते. मी कशी एकरूप झाले माहीत नाही. पण असं वाटत होतं की, माझं मन शेवरीसारखं उडून शरीराबाहेर आलंय. आणि लांबून माझ्याकडे बघतंय. कुठलंही दडपण नाही, चिंता नाही. छान हवेत तरंगतंय. आपण एक ऊर्जेचा स्रोत आहोत फक्त. आणि जर ही सगळी ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर पडली तर उरेल फक्त रिकामं शरीर.

हवेत उंच उडणाऱ्या माझ्या मनाला मी अलगद परत बोलावलं. शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या ऊर्जेची पुन्हा जाणीव करून दिली. मन आणि शरीर पुन्हा एकरूप झालं आणि मी डोळे उघडले. गेले दोन-अडीच तास माझ्याबरोबर काय झालं याचा खरंच अंदाज येत नव्हता. माझ्या डोळ्यातून फक्त पाणी येत होतं. आत्मा, देव आहे की नाही माहीत नाही. पण ऊर्जा मात्र नक्की आहे. वेगवेगळ्या स्वरूपातली. आपल्या शरीरातही भयंकर ऊर्जा आहे, फक्त तिचा योग्य वापर करायला हवा. या अशा अनुभवानंतर तुमचा अहंकार गळून पडतो. तुम्ही शांत होता. मी शांत झाले.

काही प्रवासात तुम्हाला विशिष्ट जागा सापडतात, काही प्रवासात माणसं भेटतात, तर काही प्रवासात तुम्ही स्वत:ला भेटता. पाँडिचेरीच्या या प्रवासात मी खूप माणसांना भेटले आणि प्रत्येक वेळी त्यांच्याकडून काही तरी शिकून स्वत:त सामावून घेतलं. विजयपासून राजापर्यंत सर्वानी मला भरभरून दिलं. पुस्तकंही शिकवत नाही इतकं तुम्हाला प्रवास शिकवतो. पाँडिचेरीत माझे सगळे संकोच गळून पडले. माझ्यातल्या अनेक कमीपणांवर मी मात केली. काही तरी गोष्टी नव्याने जपायला शिकले. काही गोष्टी सोडून द्यायला शिकले. माझ्या शरीराची आणि जगण्याची किंमत कळली. स्वत:चा आतला आवाज ऐकू लागले. आणि त्यावर विश्वास ठेवायला शिकले. माणसांशी मैत्री करायला शिकते.

माझं मन आता खूप शांत आणि मोकळं आहे. माझं शरीर हे फक्त त्याच घर आहे. या घरातून त्याला मोकळं सोडायला शिकले. आणि ते परतण्याची वाट पाहायला शिकले. आता खरं तर प्रवास करणं ही फक्त माझी आवड नाही तर माणूस म्हणून ती माझी गरज आहे.

Oh my Love!

IMG_0891

Oh My love,

I know I can never posses you.
But I know, there is no way
I can ever lose you.

One has a fear of losing when its a thing.
But You are not a thing,
You are the most precious feeling.

I can never become a part of your life, I know…
But I feel content to know that you are that part of ME, that no one can see, No one else can feel.

I will be happy even if I am not around you,
Because I know, I am always with you, in you.

Moments we shared will always be a part of me,
Love that we made will always stay in me.

It’s hard to tell yourself sometimes to let go of the most desired one,
Because deep inside you still await that once chance to let it work.

You may move on but you will always see me at the rear,
Just as we were… Love.

-Priya

A Dream

 

IMG_4398.JPGA Dream

I can’t be yours and you can’t be mine
But I will still be yours and you will still be mine…
I dream everyday,
that I am with you,
Sitting under the open sky,
Covering ourselves with the blanket
studded with stars.
Holding each other’s hands, and
dreaming about our la la land..
what if all this may never come true,
but I can still Dream about YOU.
I know,
I can’t be yours and you can’t be mine
but in my heart
I will still be yours and you will still be mine.

– Priya

मेघालय

IMG_1295२०१६ माझ्यासाठी सर्वात जास्त बदल घडवणारं वर्ष होत. अर्थात, वर्षाअखेरी असा वार्षिक आढावा सगळॆच जण घेतात, आणि सगळेच काहीतरी conclude करण्याचा प्रयत्न करतात. सगळे करतात म्हणून नाही, पण खरंच या वर्षात मी घेतलेले अनुभव, मला भेटलेली माणसं, झालेले नवे मित्र ह्या सगळ्यांनी माझ्यातला ‘मी’ ला जरा बदलून टाकलं. आणि वर्षाच्या शेवटी माझी पहिली solo trip plan करताना हे सगळ्यात जास्त जाणवलं.
माझं ब्रेकअप झालंय, मी एकटी आहे, जग गेलं खड्यात अशा कुठल्याही भावनेने नाही , पण फार मनापासून, एकटं फिरण्याचा अनुभव घ्यायचा होता. आणि खरंतर प्रत्येक अनुभव घेण्यासाठी काहीतरी दुःखी भूतकाळ असावा अस मला मुळीच वाटत नाही…माझं उत्तम चाललंय आणि तरीही मला एकटीला प्रवास करायचाय. हे एवढ कारण बास आहे.

डिसेंबर महिन्यात पॉंडिचेरी ची सहा दिवसांची ट्रिप केली आणि त्यानंतर आठ दिवसात लगेच मेघालय साठी रवाना झाले. (experiment, explore, evolve) एक्सपेरिमेंट,एक्सप्लोर, इवोल्व यावर माझा फार जास्त विश्वास आहे. आपण स्वतःवरही नेहमी वेगवेगळे प्रयोग करायला हवेत . नव्या माणसांबरोबर प्रवास करायला हवा, नवे मित्र जोडायला हवेत. माझ्या या दोन्ही प्रवासात मी खूप नवे मित्र मिळवलेत. अगदी वयाच्या २७ वर्षा पासून ते ७० री पर्यंत… आणि माझी नव्याने ओळख आणि मैत्री झाली ती ‘स्वतःशी’.

‘मेघालय’ ‘A house of clouds’ खरंच नावाप्रमाणे ‘ढगांच्या राज्यात’ गेल्याचा अनुभव येतो. मुंबई ते गुवाहाटी ३ तासांचा विमानप्रवासानंतर आम्ही एक शेअर टॅक्सीघेतली. हा एक पहिला अनुभव.  इथे बस किंवा ट्रेन हा प्रकार नाहीच – शेअर टॅक्सीहा एकाच पर्याय. आणि share taxi म्हणजे एका ८ सीटर Trax मध्ये ११ माणसं कोंबणे… आपल्या so called ‘travel’ च्या वाख्या पहिल्याच प्रवासात हाणून पडणार अस वाटलं नव्हतं. पण खरं सांगू का पहिल्याच प्रवासात मनाशी पक्कं झालं ‘की हे असच असणार आहे.’ आणि एकदा गोष्टी तुम्ही मान्य केल्या नं … की त्याचा त्रास होत नाही उलट आपण त्यातही वेगळी गम्मत शोधायला लागतो.

३ तासांच्या प्रवासानंतर आम्ही शिलोंगला पोहोचलो आणि वाटलं आलो आता….

आमचा गाईड आम्हाला तिथे शिलोंग Center Point (Police Bazaar) ला भेटणार होता. तिथे पोहोचून आम्ही त्याला फोन केला आणि हेल्मेट घातलेली साधारण ४ फूट १० इंच उंची, वयाने २५/२६ असा मुलगा समोर आला आणि म्हणाला चला दुसरी शेअर टॅक्सी घ्यायची आहे. आम्ही फक्त हसलो… शिलोंगवरून पुन्हा अडीच तासांचा प्रवास करून आम्ही चेरापुंजीला पोहोचलो आणि तिथून पुन्हा १ तासाचा प्रवास करून लाकिंगसो (lawkingsaw) नावाच्या गावात पोहोचलो. ह्या trip मध्ये सगळे home stay करायचे अस आधीच ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही लाकिंगसोला ‘तेरेसा’ च्या घरी राहिलो. Home stay म्हणजे त्यांच्या राहत्या घराबाहेर किंवा घरात एखादी खोली ते अश्या travellers ना भाड्याने देतात. आपल्याला त्यांचा जगण्याचा एक भाग करतात.

‘खासी’ लोकांबद्दल एक गोष्ट मला पहिल्याच दिवशी जाणवली आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी माझी खात्री अजूनच पटत गेली. ‘खासी’ हे मेघालायमधील एक जमात (one of the tribe). ‘खासी’ लोकांची खासियत म्हणजे, “अत्यंत प्रेमळ, लाघवी, पटकन तुम्हाला त्यांच्या कुटुंबाचा भाग करणारी, अत्यंत स्वच्छ, टापटीप, साधी आणि सर्वात महत्वाचं विश्वासू.” या माणसांवर विश्वास ठेवावा का ? असा प्रश्न सुद्धा मनात आला नाही. पहिल्याच रात्री तेरेसाने तिच्या गोड-हसऱ्या चेहऱ्याने आमचं स्वागत केलं आणि आमची मनं जिंकली. गरम गरम भात, वरण, आणि पाण्यात उकडलेला पालक, टोमॅटोची चटणी हे पहिल्या रात्रीचं जेवण. खरंतर आत्ताच सांगते… यापुढे प्रत्येक रात्री आणि दुपारी मी हेच जेवले होते. फक्त पालकच्या जागी बटाटा आणि अगदीच luxury म्हणजे फरसबी. सकाळी नाश्त्याला maggi आणि उकडलेली अंडी. मुळात खाण्याचे नखरे नसल्यामुळे मला काही अडचण नव्हती… पण भाता ऐवजी कधीतरी पोळी मिळाली असती तरी चाललं असतं. तेव्हढेच जिमचे चोचले. जेवण इतक साधं असलं तरी खूप चविष्ट होतं हे मात्र खरं. किंवा कदाचित एवढया प्रवासानंतर अजून काही जेवणासाठी वेगळा खटाटोप करण्याची शक्तीच नव्हती. पांघरुणात पडल्या पडल्या, १० डिग्री c च्या थंडीत डोळे मिटताक्षणीच झोप लागली.

जाग आली तेव्हा ६.३० वाजले होते आणि त्या छान गुलाबी थंडीत अजून ५ मिनिट झोपावं असं वाटत होतं. शेवटी ७.३० ला उठले आणि आमची खरी ट्रिप सुरु झाली. लायकींगसावं वरून १५ मिनिट गाडीचा प्रवास करून आम्ही बेस ला पोचलो. आणि इथून आमचा पहिला ट्रेक सुरु झाला. नोंग्रयाट (Nongriat) नावाच्या टुमदार गावाच्या दिशेने. इंटरनेट वरती याबद्दल आधीच थोडं वाचून ठेवल्यामुळे आपण काय करणार आहोत याचा अंदाज होता. पण ते नेमक कस आणि किती परीक्षा पाहणारं असेल ते काही माहित नव्हत. पाठीला १५ किलो ची सॅक अडकवून,थंडीत,३५०० पायऱ्या उतरण्याचा प्रवास सुरु झाला. एका बाजूला डोंगर, आणि दुसऱ्या बाजूला दरी… गर्द हिरवी झाडं, स्वच्छ नीटनेटनेटका परिसर आणि वाटेत लागणारी टुमदार घर. बऱ्याच घरांबाहेर फ्रुटी,पाणी,स्नॅक्स विकण्यासाठी ठेवलेले. दर थोड्या अंतरावर सारख्या काही बंद पेट्या दिसत होत्या. चौकशी केल्यावर कळलं इथे मधमाश्या पाळून त्यातून शुद्ध मद्ध घेऊन तो इथे लोक विकत होती. एकदा मनात आलं ताजा मध घेऊन जाऊया घरी. पण परत ३५०० पायऱ्या वर चढताना अजून सामान नको म्हणून नंतर घेऊ म्हटलं (पण नंतर ला नाहीं आंतर)आणि राहिल ते राहिलच…
३५०० पायऱ्या मोजण्याचा उत्साह नव्हता,पण या पायऱ्या उतरताना त्या परत चढायच्या आहेत त्याचा उत्साह मात्र होता. या प्रवासाच्या मध्यावर एक फाटा जातो जो तुम्हाला घेऊन जातो ‘द लिविंग रूट ब्रिज’ कडे. हा सगळा खटाटोप करण्याचा उद्देश हाच कि नोंग्रीट (Nongriat) गावात असलेला डबल डेकर लिविंग रूट ब्रिज पाहणे. डबल डेकर पर्यंत पोहोचण्याआधी सिंगल डेकर रस्त्यात वाट पाहत असतोच.

लिविंग रूट ब्रिज हे निसर्ग आणि माणसाच्या मैत्रीचा उत्तम उदाहरण वाटलं मला. वाडाच्या झाडाच्या पारंब्या वेली सारख्या गुंफत,त्याला दिशा देत,दोन डोंगरांमधील नदी वरून दोन गावं जोडणारा पूल. यात कुठल्याही मानव निर्मित साधनांचा वापर न करता, फक्त निसर्गाच्या अपार शक्तीचा वापर करून ५० वर्ष वाट पाहून हा पूल बांधण्यात आला. या पूला खालून वाहणारी नदी आत्ता तरी सुकलेली होती. तिकडच्या खडकांवर, गार वारं अंगावर झेलत समोर माणूस आणि निसर्गाच्या या कलाविष्काराकडे खूप वेळ बसले. माझ्या सारख्या बडबड्या मुलीला सुद्धा काही काळ न बोलता नुसत शांत बसावसं वाटलं. थोड्या वेळाने पुन्हा एकदा डबल डेकर ब्रिज च्या दिशेने कूच करण्यास आम्ही निघालो. पायऱ्या उतरताना फारच मज्जा येत होती. पण हा सगळा उतार चढताना दमछाक होणार म्हणून स्वतःवर हसू पण येत होत. अजून एक दीड तास खाली उतरल्यावर आणि २लोखंडी पूल पार केल्यावर आम्ही नोंग्रीयाट या गावी पोहोचलो. जेमतेम ३०/४० घरांचा छोटंसं गाव आणि जवळ जवळ प्रत्येक घराबाहेर होम स्टेचा बोर्ड.

फायनली आम्ही डबल डेकर ब्रिज पाशी आलो. माला फारच कमल वाटते माणसाची! आपल्या फायद्यासाठी आपण निसर्गाचा कसा उपयोग करून घेतो ना. पण नॉर्थ ईस्ट ची खासियत म्हणजे ते याच निसर्गाची काळजी पण घेतात. त्याच्या अस्तित्वाला धक्का न लागू देता निसर्गाचा पुरेपूर उपयोग करून घेतात. मला खरंच वाटत या खासी लोकांनी जरा आमच्या मुंबई ला शिस्त शिकवावी. पण असो..!

या गावाचा, पुन्हा एकदा भात, वरण, बटाट्याची भाजी असा जेवणाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. या ट्रेक ची खरी गम्मत तर आता होती. एकतर ३५०० पायऱ्या चढायच्या होत्या आणि वाजले होते ३.३. हा सगळा चढाचा प्रवास करायला ३ तास तरी लागणार आणि आम्ही भारताच्या पूर्वेला असल्याने सूर्यास्त लवकर, म्हणजे संध्याकाळी ५ वाजता होणार. म्हणजे पुढच्या दोन तासांचा ट्रेक हा चंद्राच्या आणि दिसल्याच तर चांदण्यांच्या साक्षीने होणार हे नक्की. मजल दरमजल करत वर चढत जाताना अंधारात हे चढण्याची excitement पण भारी होती. दमण्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून आम्ही मधे मधे मोबाइलवर गाणी लावत होतो. ४.३० झाले सूर्य अस्ताला आला…आकाश गुलाबी झालं… आणि दोन डोंगरांच्या मधे ढग राहायला आले. काही गोष्टी सांगून,किंवा त्यांचे फोटो काढून त्याची इंटेन्सिटी पोहचूच शकत नाही. त्या फक्त अनुभवाच्या असतात. त्या माजिकल मोमेन्ट चे आपण साक्षीदार आहोत याचाच खूप छान वाटलं मला.

सूर्यास्त झाला आणि चंद्राने आपलं राज्य स्वीकारल. शांत,गोरा गोरा, नजर लागू नये म्हणून टीट लावलेल्या बाळा सारखा. या चंद्राच्या शीतलतेने हवेतल्या गारव्याला फुल कॉम्पिटिशन द्यायच ठरवलं होत बहुतेक. चंद्र, चांदणं हे सगळं मुंबईत पाहूच नये अस वाटलं. मुंबईतला चंद्र खरंच चंद्र आहे कि एखाद्या उंच इमारतीचा लॅम्प तेहि कळणार नाही. या चंद्राने मात्र माझ्या मनात घर केलं. आणि मुळात ना तो तिथे होता.. वर आकाशात मला वाट दाखवत, त्यामुळे अंधाराची, पडायची भीतीच वाटली नाही. ढगांच्या गर्दी मुळे चांदण्या पाहायच्या राहून गेल्या, अस मनात आलं आणि डोळ्यासमोर काहीतरी चमकल . मी नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा चमकल. वाह ! काजवा ! एकाच होता, पण दिसला ! आणि खूप वेळ दिसत राहिला. निसर्ग काय कमाल आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली . त्या काजव्याच्या सोबतीने दमण बाजूला राहिल आणि पुन्हा जोमानं चढायला लागले. चंद्राची साथ मात्र शेवट पर्यंत होती. एकदाही टॉर्च लावायची संधी त्याने दिली नाही. गर्द झाडीतून सुद्धा मधेच डोकावून आम्हाला वाट दाखवत राहिला. आणि अखेर आम्ही ६.३० ला पुन्हा एकदा बेस ला आलो. आज खूप दमल्याने शांत झोप लागेलं हे नक्की . पण स्वप्नात आज तो काजवा यावा अस खूप मनापासून वाटत होत. आणि याच विचारात डोळे शांत मिटले.

पुढचा दिवस आमच आवडत ठिकाण होतं. पुन्हा एकदा प्रवासाला सुरवात करून आणि दिवसाची सुरवात मॅगी ने करून आम्ही निघालो माॅलीनाॅंग  या गावाच्या दिशेने. भारतातील सर्वात स्वछ गाव अशी याची ख्याती आहे. पुन्हा ३/४ तसंच निसर्गरम्य प्रवास सुरु झाला. कुठल्या शहराचा भाग नसतानाही, इथले सगळे रस्ते हे अत्यंत वेल मैण्टिने. मेघालय मध्यल्या एकूण खडयांचा आकडा हा माझ्या सोसायटी पासून रस्त्यापर्यंत जाताना लागणाऱ्या खाड्यांपेक्षाही निम्मा असेल. असो! तुमचा प्रवास सुखकर होण्यासाठी निसर्गाच्या जोडीने सुंदर रस्ते सुद्धा फार महत्वाचे ठरतात. आजच्या प्रवासात थोडी चंगळ होती. आज दुपारचा जेवण प्रवासात करणार होतो, कोणाच्या घरी नाही … त्यामुळे वारण भाताला आज सुट्टी. आज चायनीज खायला मिळाल. बापरे! केवढा आनंद झाला मला! मी छान मनसोक्त तिबेटियन सूप मागवल ज्याला थुक्पा म्हणतात. स्वच्छतेच्या बाबतीत अजून एक लक्षात येण्याजोगी गोष्ट म्हणजे इथली टॉयलेट्स. या सगळ्या प्रवासात, रस्त्यावरच सार्वजनिक टॉयलेट असो, कि गावातल, कि घरातल. कमालीच स्वछ. माझ्यासारख्यांसाठीचा प्रवास सुखकर करणार अजून एक कारण.

दोन्ही बाजूला डोंगर , मध्ये खोल दरी आणि कायम ढगांची साथ घेऊन आम्ही माॅलीनाॅंग  ला पोचलो. आम्ही आधीच पाहून ठेवलेल्या छोट्याश्या बांबूच्या घरात आम्ही राहणार होतो. माॅलीनाॅंग च्या रस्त्यावरून चालताना सतत मला आयर्लंड ची आठवण येत राहिली. इथले लोक आणि त्यांची भाषा सोडल्यास या गावाकडे पाहून आपण भारतात आहोत कि भारत बाहेर याचा जराही अंदाज येत नाही. छोटी, नेटकी, टुमदार घर, स्वछ रस्ते आणि निसर्ग याहून अधिक सौंदर्य वेगळ काय असत. चालत चालत माॅलीनाॅंग च्या लिविंग रूट ब्रिज ला भेट दिली. मला वाटत हा लिविंग रूट ब्रिज हा यांच्या सौंसंस्कृतीचा भाग असावा. नॉर्थ ईस्ट मध्ये हा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो अस ऐकलंय. खासी सौंस्क्रुतीच्या अजून कळलेल्या गोष्टी म्हणजे, हि मातृसत्ताक संस्कृती आहे. लग्नानंतर जर मुलीला कोणी भावंडं नसेल तर मुलगा मुलीकडे राहायला येतो. आई वडील उतारवयात एकटे पडू नये हा या मागचा विचार! किती भारी ना! मालमत्ता सुद्धा मुलाच्या नाही तर मुलीच्या नवे होते. इथे प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा स्वातंत्र्य आहे. लग्न जुळवण्याची वैगेरे भानगडच नाही. आणि जर जोडीदाराची मान्यता असेल तर एका पेक्षा अधिक प्रेमसंबंध असणे देखील या संस्कृतीत मान्य आहे. याच सर्वांमुळे मेघालय किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये खून, चोरी एकूणच गुन्हेगारी चा प्रमाण सगळ्यात कमी आहे. भाई वाह! हि खरी लिबेरेटेड लोकं.

माॅलीनाॅंग चा लिविंग रूट ब्रिज बघून आम्ही थोडा विरंगुळा करण्यासाठी थांबलो. या गावात एक अशी जागा होती जिथून बांगलादेश दिसतो असा ऐकलं होता. आमचा गाईड एम्बोर ला विचारल तर म्हणाला मी तुम्हाला त्याही पेक्षा सुंदर ठिकाणी नेतो. जिथे फारसे टुरिस्ट येत नाहीत कारण ती जागा फक्त स्थानिक लोकांनाच माहित आहे. मग काय क्षणाचाही विलंब न करता निघालो. जाताना छोटीशी सुकलेली नदी ओलांडायची होती. डोंगर चढण्या-उतारण्याबद्दल मला एवढा उत्साह असेल अस कधी वाटलं नव्हत. पण जोपर्यंत तुम्ही सुरवात करत नाही तोपर्यंत कळणार तरी कसं. मोठमोठ्या दगडांमधून, झाडांमधून वाट काढत आम्ही मुख्य रस्त्यापर्यंत येऊन पोचलो . तिथून दोन छोटी गाव चालत पार केल्यावर आम्ही एका झाडापाशी येऊन थांबलो. त्या झाडावर एक सुंदर घर बांधलं होतं. ट्री हाऊस! ट्री हाउस वर आलो. वर पोचल्यावर माझी नजर खिळली. मन शांत झालं, विचार बंद झाले. आणि फक्त शांतता. पानांची सळसळ ऐकू येऊ लागली. माझ्या उजव्या बाजूला खोल दरी…समोर विशाल पहाड…आणि डावीकडे नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला बांगलादेश . मन सून्न करणाऱ्या या वातावरणात खूप गप्पा झाल्या. शांतपणे…वेगवेगळ्या विषयांवर. अगदी भारताच्या फाळणीपासून ते आईन्स्टाईन पर्यंत. आणि या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट लक्षात आली, आपण अजून किती छोटे आहोत. निसर्गाच्या कुशीत खोलवर शिरताना सतत जाणवत राहत. सायन्स कितीही प्रगत झाल तरीही. निसर्ग हेच आपला मूळ आहे. आणि आपण त्याचा एक छोटा अंश आहोत फक्त. आपलं लहानपण मान्य करण्यासाठी हिम्मत लागते, स्वतःला समर्पित करावा लागत, शरण जावा लागत. हळूच कोणीतरी फुंकर मारावी तस मनाला गार वर स्पर्शून जात होत. “तुम्ही कितीही चुका केल्यात तरी माझे आहात” असं म्हणणारा निसर्ग, आपल्याकडे लहान मुलाकडे पाहावं तसं पाहणारा हा विशाल पहाड, निरभ्र, शांत आकाश, आणि प्रेमाने स्पर्शून जाणारी वाऱ्याची झुळूक अनुभवली. खूप सारा स्वछ प्राणवायू छातीत साठवून घेतला आणि पाय निघत नव्हता तरीही आम्ही निघालो. रूमवर परतलो.

बास! आता याहून अजून काही चकित करणार घडेल असं वाटलं नव्हतं, जोपर्यंत आम्ही डावकी गाव जवळच्या कॅम्प साईट ला पोचलो नव्हतो. डावकी गावातून बोटीने आम्ही निघालो. ४५ फूट खोल उमनॉन्ग नदी पण तरीही तळाशी असलेला दगडही स्पष्ट दिसत होता. परवा दुरून पाहिलेला बांगलादेश आज एकदम एका हाताच्या अंतरावर होता. आणि निसर्ग भेदभाव करत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल. उमनॉन्ग नदी जितकी भारताची तितकीच बांगलादेशची सुद्धा. मध्ये फक्त एक दोरी. जिच्या एका बाजूला भारतीय बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश बॉर्डर सेक्युरिटी फोर्स. मी हि अशी भारतात उभी राहून, दोरीपलीकडच्या पर्यटकांसाठी खजूर विकण्याचा स्टॉल लावलेल्या काकांकडून खजूर विकत घेऊ शकत होते. मला याच फार कौतुक वाटत होतं. तिथेच नागपूरचे सावन आरेकर भेटले. जे तेव्हा तिथे ड्युटी वर होते. त्यांना सुद्धा घरापासून एवढ्या लांब मराठी माणूस भेटल्याचा आनंद झाला. खरंतर प्रश्न मला विचारायचे होते, पण तेच म्हणाले,”एवढ्या लांबून तुम्ही फक्त फिरायला आलात? एकटं फिराची भीती नाही वाटत?” मी म्हटलं “मेघालय मधे तरी नाही वाटली बुवा. आणि तुम्ही आहातच कि !” खरतर मला खूप जास्त Inspired वाटत होतं त्यांना भेटून. या सगळ्या जवानांना काय motivate करत असेल? दिवसभर या एका जागी उभं राहून, कोणी बॉर्डर पार करत नाही ना हे पाहताना कंटाळा येत नसेल का ? का आपण देशासाठी काहीतरी करतोय हि भावना इतकी मोठी असते कि त्यापुढे हे सगळं शुल्लक वाटत. आपण आपल्या आयुष्यात एक गोष्ट मनासारखी झाली नाही तर लगेच पर्याय शोधतो. नोकरी बदलतो, नाती सुद्धा बदलतो. पण खरतर कुठल्याच luxuries नसतानाही, स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या माणसांपासून लांब, आपली काहीच वैयक्तिक ओळख नसलेल्या तमाम करोडो लोकांसाठी स्वतःच आयुष्य पणाला लावणं. खरंच मनात आदर आणि खूप आदर या पलीकडे बाकी काहीच नाहीये.

पुन्हा आमच्या बोटीत बसलो. शांत नदीत बुडणार सूर्य पहिला. आणि त्याला टाटा म्हणत आमच्या कॅम्प साईटला पोचलो. शांत वाहणारी नदी, आणि पाण्याच्या सहवासाने अजूनच गार झालेली हवा. आम्ही आमच्या तंबूत सामान टाकलं. आणि बाहेर बाकावर छान कॉफी पीत अंधार होण्याची वाट पाहत बसलो. हा माझा कॅम्पिंगचा पहिलाच अनुभव होता. काळोख झाला. चंद्र हळू हळू त्याची सत्ता गाजवू लागला. मधेच २/४ चांदण्या लुलुकताना दिसल्या. आम्ही नदी किनाऱ्या जवळचे दगड गोळा करून आमच्या तंबू बाहेर आणले. आणि कॅम्पफायर तयार केलं. दोन डोंगरांच्या मध्ये शांतपणे वाहणारी उमनॉन्ग नदी, तिच्या किनाऱ्यावर वसलेला आमचा तात्पुरतं घर, आणि उब देण्यासाठी घराबाहेर शेकोटी. या सगळ्यात अत्यंत आनंद देणारी गोष्ट म्हणजे पौर्णिमेचा चंद्र. मेघालय च्या या संपूर्ण प्रवासात या चंद्राने मला भुरळ घातली, आणि मी खरंच याच्या शांततेच्या प्रेमात पडले. नदीजवळचे दगडही चकाकत होते इतका स्वच्छ, लक्ख प्रकाश या चंद्राचा होता. गाणी, गप्पा,म्युजिक, कॉफी, चंद्र. याहून रोमँटिक काही असूच शकत नाही. हि रात्र आमची मेघालय मधील शेवटची रात्र होती. उद्या दुपारी परतीचा प्रवास सुरु होणार. त्यामुळे या रात्रीचा प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवत होते.

दुसऱ्या दिवशी दुपारी परतीचा प्रवास सुरु झाला. पून्हा शेअर टॅक्सी , पुन्हा तीन तासांचा चेरापुंजी चा प्रवास , तिथून तीन तास शिलॉँग आणि तिथून तीन तास गुवाहाटी. पण आत्ताच्या या प्रवासात हे रस्ते, हि माणसं, हि हवा ओळखीची आणि आपली वाटतं होती. आपल्या स्वतःच्या वीकएंड होम ला जाऊन वेळ घालवून आता परत घरी जाताना जसं वाटेल अगदी तसं वाटत होत. सहाच दिवसात मेघालय आपलं वाटू लागल होत. एअरपोर्ट पर्यंत च्या आठ/नऊ तासांच्या प्रवासात या सहा दिवसांची मनात उजळणी झाली. आठवणींनी मन भरलं होत, पण शांत होत. मनात पुन्हा पुन्हा उमनॉन्ग नदीचा किनारा आठवत राहिला. बोटीत बसून तो दिसेनासा होईपर्यंत मी एकटक त्याकडे पाहत होते. पुन्हा या जागी येईन कि नाही माहित नाही म्हणून आज डोळे भरून हि सगळी निसर्गाची किमया डोळ्यात साठवून ठेवत होते. मला वाटतं , आयुष्यात कुठलंही कन्फ्युजन च्या क्षणी मला या जागेची शांतता आणि तो पौर्णिमेचा शांत चंद्र नक्की आठवत राहील.

प्रवासाला बाहेर पडले तेव्हा काही साध्य करायचा नव्हतं. पण घरी परतताना मनात खूप काही घेऊन चालले होते हे मात्र खरं. प्रवास तुम्हाला खूपकाही शिकवतो. जगाबद्दल, माणसांबद्दल, निसर्गाबद्दल, आणि तुमच्या स्वतःबद्दल. प्रवास अनेकदा तुम्हाला शब्दहीन करतो, पण तुमच्या मनात त्या आठवणीच घरही बांधतो. प्रवास तुम्हाला स्वतःवर नव्याने प्रेम करायला शिकवतो, आहे त्या परिस्थितीत जगायला शिकवतो, त्यात आनंद मानायला शिकवतो. प्रवास तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध करतो. माझी आत्ताशी सुरुवात झाली आहे. अजून खूप फिरायचं, खूप शिकायचंय.
I want to find more beautiful places to get lost. I am loving it, rather I am living it!